Side Menu Packages of Practice

काकडी

प्रस्‍तावना

काकडी हे भारतीय पिक असल्‍याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्‍या अतिपर्जन्‍याच्‍या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्‍पादन निघते. काकडी पासून कोशिंबिर बनविली जाते. त्‍यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्‍ये दररोज उपयोग होतो. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 3711 हेक्‍टरवर या पिकाची लागवड होते.

हवामान आणि जमीन

काकडी हे उष्‍ण आणि कोरडया हवामानात वाढणारे पीक आहे. पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी मध्‍यम ते भारी जमीन या पिकास योग्‍य असते.

लागवडीचा हंगाम

काकडीची लागवड खरीप आणि उन्‍हाळी हंगामात होते. खरीप हंगामासाठीकाकडीची लागवड जून जूलै महिन्‍यात व उन्‍हाळी हंगामामध्‍ये जानेवारी महिन्‍यात करतात.

वाण

शीतल वाण - ही जात डोंगर उताराच्‍या हलक्‍या आणि जास्‍त पावसाच्‍या प्रदेशात चांगली वाढते. बी पेरणीपासून 45 दिवसांनी फळे चालू होतात. फळे रंगांनी हिरवी व मध्‍यम रंगाची असतात कोवळया फळांचे वजन 200 ते 250 ग्रॅम असते हेक्‍टरी उत्‍पादन 30 ते 35 टन मिळते.

पुना खिरा - या जातीमध्‍ये हिरवे आणि पिवळट तांबडी फळे येणारे दोन प्रकारचे बियाणे बाजारात मिळते. ही लवकर येणारी जात असून फळे आखूड असतात. ही जात उन्‍हाळी हंगामात चांगली असून हेक्‍टरी उत्‍पादन 13 ते 15 टन मिळते.

प्रिया - ही संकरीत जात असून फळे रंगाने गर्द हिरवी व सरळ असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 30 ते 35 टन मिळते.

पुसा संयोग - लवकर येणारी जात असून फळे हिरव्‍या रंगाची असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 25 ते 30 टन मिळते. या शिवाय पॉंइंट सेट, हिमांगी, फुले शुभांगी यासारख्‍या जाती लागवडीस योग्‍य आहेत.

बियाणे प्रमाण

या पिकाकरीता हेक्‍टरी 2.5 ते 4 किलो बियाणे लागते.

पुर्वमशागत व लागवड

शेतास उभी आडवी नांगरणी करुन ढेकळे फोडून काढावी व एक वखारणी द्यावी. शेतात चांगले कुजलेले 30 ते 50 गाडया शेणखत टाकावे. नंतर वखरणी करावी. उन्‍हाळी हंगामासाठी 60 ते 75 सेमी अंतरावर स-या पाडून घ्‍याव्‍यात. खरीप हंगामात कोकण विभागास काकडीची लागवड करावयाची असल्‍यास दर 3 मीटर अंतरावर 60 सेमी रूंदीचे 30 सेमी खोलीचे चर खोदूर चरांच्‍या दोन्‍ही बाजूंना 90 सेमी अंतरावर ओळी 30 × 30 × 30 सेमी अंतरावर आकाराचे खडडे तयार करावेतञ प्रत्‍येक खडडयात 2 ते 4 किलो शेणखत मिसळावे. प्रत्‍येक आळयात 3 ते 4 बिया योग्‍य अंतरावर लावाव्‍यात.

खते व पाणी व्‍यवस्‍थापन

काकडी पिकास 50 किलो नत्र 50 किलो पालाश 50 किलो स्‍फूरद लागवडीपूर्वी द्यावे. व लागवडीनंतर 1 महिन्‍याने नत्राचा 50 किलोचा दुसरा हप्‍ता द्यावा व पावसाळयात 8 ते 10 दिवसाचे अंतराने पाणी द्यावे व उन्‍हाळयात 4 ते 5 दिवसांच्‍या अंतराने पाणी द्यावे.

आंतरमशागत

काकडीचे वेलांना आधार दिल्‍यास फळांची प्रतीक्षा सुधारते परंतू ते खर्चिक असल्‍याकारणाने महाराष्‍ट्रामध्‍ये काकडीचे पीक जमिनीवर घेतले जाते. लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी पिकातील गवत काढून टाकावे. फळे लागल्‍यानंतर फळांचा संपर्क मातीशी येऊ नये म्‍हणून फळांखाली वाळलेला काटक्‍या घालाव्‍यात.

काढणी व उत्‍पादन

फळे कोवळी असतानाच काढणी करावी म्‍हणजे बाजारात चांगला भाव मिळतो. काकडीची तोडणी दर दोन ते तीन दिवसांच्‍या अंतराने करावी. जाती व हंगामानुसार काकडीचे हेक्‍टरी 200 ते 300 क्विंटल पर्यंत उत्‍पादन मिळते