नाला काठ स्थिरीकरण

नाला काठ स्थिरीकरण

राज्याच्या काही भागात मोठया प्रमाणात पडणारा पाऊस, काळया जमिनीचे मोठया प्रमाणात असलेले प्रमाण व विशेष भौगोलिक परिस्थितीमध्ये नाल्यास योग्य तो आकार न राहणे, नाल्यामध्ये निरनिराळया प्रकारचे अडथळे निर्माण होवून आजूबाजूच्या शेतीचे नुकसान होणे, त्याशिवाय एकंदरीत निचरा कमी होवून जमिन खारवट होणे, अशा बाबीसाठी निचरा सुधारण्यासाठी नाला काठ स्थिरीकरणाची कामे हाती घेण्यात येतील.

  • नाला काठ स्थिरीकरणाची कामे ही पाणलोट क्षेत्र आधारित जलसंधारण कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या गावात पाणलोट विकासाचा भाग म्हणून घेण्यात यावीत.
  • नाला काठ स्थिरीकरणासाठी निवडलेल्या नाल्याची एकूण लांबी ही उगमापासून ते संगमापर्यन्त 5 कि.मी. पेक्षा जास्त असू नये.
  • नाल्याचा तळउतार 3 टक्क्यापेक्षा असू नये.
  • नाल्यावर येणा-या पाण्याचे एकूण पाणलोट क्षेत्र हे.1000 हेक्टरच्या मर्यादेत असावे.
  • सदरची कामे 700 मि.मी. पेक्षा जादा वार्षिक पाऊस असणा-या व काळी व भारी माती असलेल्या जमिनीचे प्रमाणे मोठया प्रमाणात असलेल्या क्षेत्रातच घेण्यात यावीत.
  • नाला काठ स्थिरीकरणाची कामे घेताना केवळ नाल्याच्या पात्रातील अडथळे दूर करणे व ज्या ज्या ठिकाणी नाल्याचे पात्र अत्यंत उथळ व वेडेवाकडे झालेले आहे अशा ठिकाणी कमीत कमी प्रमाणांत खोदकाम करणे ही तत्वे ही कामे घेतांना प्रामुख्याने पाळावयाची असून कोणतही परिस्थितीत जुन्या नाला सरळीकरणाच्या पध्दतीप्रमाणे हाती घेतली जाणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
  • सदर योजना ही फक्त शेतीविषयक सुधारणा कामासाठीच राबवावी व कोणत्याही परिस्थितीत गावातील किंवा वस्तीतील पूर नियंत्रणासाठी ही योजना पर्यायी योजना म्हणून राबवू नये.