यशोगाथा -2

यशोगाथा -2

"शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकरी विकासाच्या मार्गावर” व्ही.आर.डी .ॲग्रो - प्रोडयुसर कंपनी मौजे.सारोळा (बु.) जिल्हा :उस्मानाबाद.

पार्श्वभूमी:

शेती उत्पादनात झालेल्या उल्लेखनीय प्रगतीमध्ये कृषि विद्यापीठे,कृषि विभाग आणि कष्टकरी शेतकरी यांचे महत्वाचे योगदान राहिलेले आहे. हे जरी खरे असले तरी मोजक्या शेतक-यांची आर्थिक परिस्थिती आणि राहणीमान यात चांगला बदल झालेला दिसून येतो.बहुतेक शेतक-यांची आर्थिक उन्नती जेवढी व्हायला पाहिजे होती तितकी होऊ शकली नाही यामध्ये छोटया शेतक-यांची संख्या अधिक आहे.त्यांच्या छोटया शेतीच्या आकारावर व त्यातील उत्पादनाच्या विक्रीवर बंधने आहेत.शेतक-यांची शेती खरोखरच उत्पादनक्षम राहून लाखो लोकांना जगण्यासाठी अवलंबून असलेला तो एक प्रमुख स्त्रोत असल्याने शेती व्यवसायातील त्यांचे स्वारस्य अबाधित ठेवणे हे सर्वांच्या हिताचे आहे. ॲड.अमोल रणदिवे व श्री.कैैलास पाटील या दोन सुशिक्षित शेतकरी तरुणांनी मौजे सारोळा (बु.),ता/जि.उस्मानाबाद येथील काही तरुण शेतक-यांना एकत्र करुन व्हीआरडी ॲग्रो प्रोडयुसर कंपनीची स्थापना केली.शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी मे-2013,मध्ये करण्यात आली. सदर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणेसाठी एडीएम ॲग्रो कंपनी,लातूर ही सोयाबीन खरेदी व पक्रियेमध्ये अग्रगण्य कंपनी व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषि विभाग उस्मानाबाद यांची मदत झाली.सुरुवातीला एकूण रुपये 10.0 लाखाचे भागभांडवल उभे केले.गावामध्ये कृषि यांत्रिकीकरण,सोयाबीन बिजोत्पादन,सार्वजनिक व खाजगी भागीदारीतून प्रकल्प अंमलबजावणी व जलयुक्त शिवार अभियान या सारखे उपक्रम राबवून शेतकरी सदस्यांना विकासाचा मार्ग दाखवून दिला आहे. त्याची माहिती येथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

सोयाबीन पीक उत्पादनात यांत्रिकीकरण :- संशोधन केंद्रांना भेटी:-

मराठवाडा विभागात सोयाबीन लागवडीचे क्षेत्र जास्त आहे.सोयाबीन पिकाच्या वाढत्या क्षेत्रामुळे शेती कामात शेत मजुरांची समस्या भेडसावत आहे.कंपनीने सर्व प्रथम सोयाबीन पिकात यांत्रिकीकरण करण्याचे ठरविले.सोयाबीन पिकाची आणि यांत्रिकीकरणाची माहिती घेण्यासाठी आत्माच्या माध्यमातून सोयाबीन संशोधन केंद्र,इंदोर व यांत्रिकीकरणासाठी भोपाळ येथे सर्व सदस्यांनी अभ्यास दौरा आयोजित केला.

बँकांचा सहभाग:-

अभ्यास दौ-यानंतर शेतकरी उत्पादन कंपनीने कृषि यांत्रिकीकरणाबाबत प्रकल्प अहवाल तयार केला.भाडे तत्वावर उत्पादक कंपनीच्या शेतकरी सदस्यांना यंत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा-उस्मानाबाद यांचेकडून रु.34.00 लाखाचे कर्ज मंजूर करुन घेतले. शेतीसाठी अत्यावश्यक व गरजेची असलेली यंत्रे जसे ट्रॅक्टर,बी.बी.एफ.यंत्र,रोटाव्हेटर,स्प्रेयर,हार्वेस्टर इ.प्रथम खरेदी केले.यासाठी कृषि विभागाकडून रु.18.10 लाख अनुदान मिळाले.खरीप हंगाम 2013 मध्ये एकूण 35 शेतक-यांनी एकत्रित येऊन सुमारे 300 एकर क्षेत्रावर यांत्रिकीकरणाद्वारे सोयाबीन उत्पादनाचा कार्यक्रम राबविला.त्यात बीबीएफद्वारे पेरणी,कोळपणी,फवारणी,काढणी इ.सर्व कामे भाडेतत्वावर करण्यात आली.

उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादनात वाढ :-

यांत्रिकीकरणामुळे शेतक-यांना पारंपारिक सोयाबीन लागवड पध्दतीच्या तुलनेत लागवडीच्या खर्चात 24 टक्के बचत झाली.त्याचप्रमाणे प्रती एकर 3 ते 4 क्विंटल एवढे म्हणजे 30 टक्के सोयाबीनचे अधिक उत्पादन मिळाले.यांत्रिकीकरणाचा उपयोग हरभरा,करडई, गहू या पिकासाठी करण्यात आला.त्यातून शेतक-यांचे उत्पादन व उत्पन्न वाढले आणि कंपनीस रु.7.00 लाख एवढा फायदा झाला.

विस्तार कार्यात कृषि विज्ञान केंद्राचा सहभाग :-

रब्बी हंगाम 2013 मध्ये कृषि विज्ञान केंद्र,तुळजापूर यांच्या तांत्रीक मार्गदर्शनाखाली व त्यांनी पुरविलेल्या पीक उत्पादन निविष्ठांच्या मदतीने कंपनीच्या कार्यक्षेत्रात सुमारे 200 एकर क्षेत्रावर हरभरा पीक उत्पादनाचा कार्यक्रम राबविण्यात आला.या उपक्रमामुळे शेतक-यांना एकरी 7 ते 8 क्विंटल हरभरा पिकाचे उत्पादन मिळाले आहे.

सार्वजनिक खाजगी भागीदारी उपक्रम (PPP) :-

आत्मा अंतर्गत सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) मेरीको लि.,मुंबई या कंपनीने करडई पिकाच्या एसएसएफ-708 या वाणाचे 150 एकर क्षेत्रावर पीके प्रात्यक्षिके धेतली.यासाठी मेरीको कंपनीने करडई पिकाच्या मोफत बियाण्याचा पुरवठा केला व आत्मा, उस्मानाबाद कार्यालयाने आवश्यक त्या निविष्ठांचा सदस्यांना पुरवठा केला. कृषि विभाग व मेरीको कंपनी यांनी तांत्रीक मार्गदर्शन केले. करडईस बाजारभावर रु.2700 ते 2800 प्रती क्विंटल असताना मेरीको कंपनीने रु.3000 प्रती क्विंटल या हमी भावाने एकूण 160 क्विंटल करडई खरेदी केली.जागेवर खरेदी केल्याने इतर खर्चात (वाहतूक,हमाली,आडत,तोलाई) साधारणत: रु.300 प्रती क्विंटल इतकी बचत झाली. त्याचप्रमाणे रु.200 प्रती क्विंटल एवढा जास्त भाव मिळाला,म्हणजेच रुपये 500 प्रती क्विंटल इतका फायदा झाला.उत्पादक कंपनीच्या शेतक-यांना एकूण रुपये 80,000/- इतका जादाचा फायदा झाला.

ग्रामबिजोत्पादन व प्रक्रिया :-

व्ही.आर.डी.ॲग्रो प्रोडयुसर कंपनीने शेतक-यांना पहिजे त्या वाणाचे उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध व्हावे या दृष्टीने खरीप 2014-15 मध्ये 3 जिल्हयातील 18 गावात आणि 187 शेतक-यांच्या शेतात एकूण 700 एकर क्षेत्रावर सोयाबीन पिकाच्या एमएयुएस-158 आणि डीएस-228 या उन्नत वाणांचा ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविला.त्यातून 4000 क्विंटल बियाणे उत्पादन करुन प्रक्रिया केली.प्रक्रिेयेसाठी स्वत:चे बिजप्रक्रिया युनिट उभारले असून त्यासाठी कृषि विभागामार्फत रुपये 7.50 लाखाचे अनुदान मिळाले.तसेच कंपनीच्या 225 सभासदांकडून रु.10.00 लाख भागभांडवल उभे केले व उर्वरीत रु.17 लाख एवढी रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र कडून कर्ज रुपाने घेतली.यामुळे उत्पादक शेतक-यांना प्रती क्विंटल 3 ते 3.5 हजाराचा बियाणे उत्पादनातून फायदा झाला आहे. खरीप हंगाम सन-2015-16 मध्ये शेतक-यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार बियाणे उपलब्ध झाले आहे.कंपनीने बियाणे व धान्य साठवणीसाठी 500 टन एवढया क्षमतेचे गोदाम बांधले आहे.त्यास कृषि विभागाचे रु.5.00 लाख अनुदान गळित धान्य विकास योजनेतून उपलब्ध झाले आहे.

जलयुक्त शिवार अभियानात सक्रिय सहभाग :

गावातील पाणी टंचाई व सिंचन सुवीधांची कमतरता लक्षात घेवून मार्च-2015 पासून व्हीआरडी शेतकरी उत्पादक कंपनीने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.कृषि विभाग,जिल्हा प्रशासन व लोकसहभागाच्या मदतीने गावातील 9 किमी लांबीच्या नाल्यावरील प्रस्तावीत 14 बंधारे आणि 7 सिमेंट नाला बांधांपैकी एकूण 7 बंधारे व 7 सिमेंट नाला बांधामधील पाणीसाठयातील नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण केले आहे.तसेच 6 किमी लांबीचे काम पुर्ण केले आहे.या कामामुळे शिवारातील वाहून जाणा-या पावसाच्या पाण्याचा 733 टीसीएम एवढा अपधाव अडविण्यास मदत होणार आहे.यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्याबरोबरच पिकासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

उत्पादक कंपनीचे प्रस्तावित उपक्रम :-

• उत्पादक कंपनीच्या शेतकरी सभासदांकडे 14 पॉलीहाऊसची उभारणी सुरु आहे. • खरीप हंगाम 2015 मध्ये सुमारे 1000 एकर क्षेत्रावर सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रम राबविला जात आहे. • रब्बी हंगामामध्ये 500 एकर क्षेत्रावर हरभरा बिजोत्पादन कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. • शेतमाल विक्रीसाठी विविध कंपनीबरोबर करार करण्याचा मानस आहे. • ऊस लागवड क्षेत्राखालील सुमारे 100 एकर क्षेत्रावर क्लस्टर पध्दतीने केळी पिक लागवडीचे नियोजन करण्यात येत आहे. • शेतकरी सभासदांकडे 100 टक्के सुक्ष्मसिंचनाचा वापर होणेसाठी शेतक-यांना प्रवृत्त करण्यात येत आहे.

मान्यवरांच्या भेटी व मार्गदर्शन :-

मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्य, ना.डॉ.दिपक सावंत,पालक मंत्री, उस्मानाबाद,मा.श्री.उमाकांत दांगट,विभागीय आयुक्त,औरंगाबाद,मा.डॉ.प्रशांत नारनवरे,जिल्हाधिकारी,उस्मानाबाद त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,उस्मानाबाद,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आणि प्रकल्प संचालक,आत्मा,उस्मानाबाद,कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ व सर्व संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी व्ही.आर.डी.शेतकरी उत्पादक कंपनीच्या उपक्रमास भेट देऊन मार्गदर्शन केले व समाधान व्यक्त केले आहे.राज्यातील लातुर,बीड,नांदेड,वाशीम,सोलापुर जिल्हयातील असंख्य शेतकरी बांधवांनी भेटी देवुन कामकाजाची माहिती घेतली.या कंपनीचे कामकाज पाहून परिसरात व जिल्हयात अशाच प्रकारच्या शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन होत असून व्हीआरडी ॲग्रो प्रोडयुसर कंपनी ही महाराष्ट्रातील इतर कंपन्यासाठी रोल मॉडेल ठरली आहे.

सारांश:-

शेतक-यांना शेती करतांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.त्यात बदलते हवामान त्यामुळे अवेळी पडणारा पाऊस,भांडवलाची कमतरता,मजुर टंचाई,शुध्द बियाणेची उपलब्धता,महागडे शेती निविष्ठा आणि शेतमाल विक्री,उत्पादन खर्च न निघणे या काही प्रमुख समस्या आहेत.यावर मात करण्यासाठी छोटया शेतक-यांनी एकत्र येऊन उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा एक प्रभावी पर्याय पुढे येत आहे.राज्यात स्थापन करण्यात आलेल्या अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आता त्यांच्या सामूहिक प्रयत्नातून,कृषि विभाग आणि खाजगी संस्था यांच्या कृतीशील सहभागातून विकासाच्या वाटेवर आल्याचे एक उदाहरण म्हणजे उस्मानाबाद जिल्हयातील सारोळा बुद्रुक या छोटया गावात सुरु असलेले व्ही.आर.डी.या शेतकरी उत्पादक कंपनीचे काम होय.
पत्ता व संपर्क क्रमांक: व्ही.आर.डी.ॲग्रो-प्रोडयुसर कंपनी, मु.पो.सारोळा,ता/जिल्हा:उस्मानाबाद. 1.श्री.अमोल रणदिवे,संचालक, मो.नं.9422656008 2. श्री.कैलास पाटील, संचालक, मो.नं.9423339631