खोल सलग समपातळी चर

खोल सलग समपातळी चर (Deep C.C.T.)

राज्यात पाणलोट विकासाच्या विविध योजनेमध्ये मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये शेतीस अयोग्य असलेल्या पडीक जमिनीवर सलग समपातळीचर हा उपचार राबविण्यात येतो. यामध्ये 0 ते 33 टक्के उताराच्या जमिनीवर समपातळीत 60 सें.मी. रुंद व 30 सें.मी.खोल तसेच 60 सें.मी. रुंद व 45 सें.मी. खोल या आकाराचे सलग समपातळी चर खोदण्यात येतात. अशा सलग समपातळी चरांची खोली कमी असल्याने ते गाळाने लवकर बुजतात व पर्यायाने त्यामध्ये आवश्यक जलसंधारण होत नाही. त्यामुळे 0 ते 8 टक्के उताराच्या पडीक जमिनीवर 1 मी. रुंद व 1 मी. खोल आकाराचे खोल सलग समपातळी चर खोदल्यास डोंगर उतारावरुन वाहून जाणारे पाणी चरांमध्ये साठून चांगल्या प्रकारे मृद व जलसंधारण होते, असे दिसून आले आहे. सदर बाब विचारात घेवून शासननिर्णय क्र. जलसं-2010/प्र.क्र.18/ जल-7, दि. 23/4/2010 अन्वये आदर्शगांव योजनेमध्ये निवडलेल्या गावामध्ये खोल सलग समपातळी चराचे काम प्रायोगिक तत्वावर घेण्यास मान्यता देण्यात आली होती.

खोल सलग समपातळी चरामुळे खालील होणारे फायदे :-

 • जमिनीवरील सुपीक मातीचा थर त्याच ठिकाणी अडवून ठेवणे व पाणी जमिनीत मुरविणे.
 • जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध होतो. तसेच पाझर तलाव, नाला बांध इ. मध्यें गाळ साचण्यास प्रतिबंध होतो.
 • धरणामध्ये व बंधा-यांमध्ये स्वच्छ पाण्याचा पुरवठा होतो.
 • डोंगरामध्ये पाणी मुरल्यामुळे भूगर्भामध्ये पाणी जास्त काळ टिकून राहते. त्यामुळे झाडोरा वाढीस मदत होते.
 • क्षेत्राचे आगीपासून संरक्षण होते.
 • रखवालदाराचा खर्च वाचतो.
 • जनावरांच्या उपद्रवापासून संरक्षण होते.
 • वृक्ष संवर्धन व गवत वाढ होण्यास मदत होते.

खोल सलग समपातळी चराचे वरील फायदे विचारात घेवून शासननिर्णय क्र.जलसं/2012/प्र.क्र.23/ जल-7, दि. 5 मार्च, 2013 नुसार खोल सलग समपातळी चर (Deep C.C.T.) हा उपचार पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत राज्यभर राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

उद्देश :-

 • डोंगर माथ्यावरुन वेगाने वाहत येणा-या पावसाच्या पाण्याची गती कमी करणे.
 • जमिनीची धूप कमी करणे.
 • वाहत येणारे पाणी जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरविणे.
 • पडीक जमिन उत्पादनक्षम बनवून काही प्रमाणात क्षेत्र वहितीखाली आणणे.
 • उपचार योग्य पडीक व अवनत जमिनीचा विकास प्रभावीपणे व वेगाने करणे.

क्षेत्राची निवड :-

 • पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या गावातील पाणलोट क्षेत्रामध्येच हा कार्यक्रम राबवावा.
 • जमिनीचा उतार जास्तीत जास्त 8 टक्क्यांपर्यंत असावा.
 • जे शेतकरी सदरचा कार्यक्रम घेण्यास उत्सुक असतील, अशा लाभार्थ्यांच्या क्षेत्रातच हा कार्यक्रम राबविण्यात यावा. नियमानुसार संबंधित शेतक-यांची लेखी संमती घ्यावी.
 • लाभार्थींचे मालकीच्या क्षेत्रावर योजना राबवावयाची असल्याने लाभार्थींनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
 • चरा लगतच्या बांधावर निर्माण होणा-या झाडा झुडपांचे संरक्षण करणारा लाभार्थी असावा.

चरांची आखणी करणे :-

 • सर्वप्रथम पाणलोट क्षेत्रात नमूद केल्याप्रमाणे वहिती अयोग्य क्षेत्राचे 30 X 30 मी. अंतरावर सर्व्हेक्षण करुन तयार केलेले समपातळी नकाशे प्राप्त करुन घ्यावेत.
 • सदर क्षेत्राचे 30 X30 मी. अंतरावर दुर्बिणीच्या सहाय्याने समपातळी दर्शक नकाशा तयार करावा. जमिनीचा उतार 8 टक्केपेक्षा कमी असल्याची खात्री करावी.
 • ओहोळ, नाला, नकाशावर मार्क करुन त्या भूमापन क्रमांकाचे भूस्वरुपानुसार वेगवेगळे भाग करावे व त्या भागांना अ, ब, क, ड ……. असे क्रमांक देण्यात यावेत.
 • खोल सलग समपातळी चराची आखणी समपातळीतच होणे आवश्यक आहे.

खोल सलग समपातळी चर खोदणे :-

 • निवडलेल्या क्षेत्रांमध्ये खोल स.स. चराची आखणी करुन प्रति हेक्टरी 240 मी. लांबीचे 1 मी. रुंद व 1 मी. खोल आकाराचे चर खोदण्यात यावेत.
 • दोन चरातील उभे अंतर 33 मी. व प्रत्येक 20 मी. लांबीचे चर खोदल्यानंतर जादा पाणी काढून देण्यासाठी दोन मी.चे अंतर (गॅप) सोडून दुसरा 20 मी. लांबीचा चर काढावा. दोन चरातील अंतर (गॅप) ठेवताना सदर गॅप स्टॅगर्ड पध्दतीने येतील असे नियोजन करावे. याकरिता निवडलेल्या गटातील चराची दुसरी ओळ खोदताना त्यातील सुरुवातीच्या चराची लांबी 20 मी. ऐवजी 10 मी. लांबीचे खोदून 2 मी. अंतर (गॅप) सोडून त्याच समपातळीत 20 मी. लांबीचा दुसरा चर खोदावा. अशा त-हेने गटातील सर्वचर स्टॅगर्ड पध्दतीने खोदावेत.
 • चर खोदताना चरातून निघालेली माती उताराच्या (चराच्या खालील) बाजूस 30 सें.मी. बर्म सोडून व्यवस्थितरित्या रचून त्याचा 1 मी. उंचीचा बांध घालण्यात यावा.
 • चराच्या आखणीमध्ये झाडे झुडपे असल्यास ती तोडू नयेत किंवा मशिनरीने मोडू नयेत. याकरिता तेवढया भागामध्ये चर खोदण्यात येवू नये.
 • खोल सलग समतल चराच्या भरावावर 1 मी. अंतरावर शिसम, शिसू, खैर, करंद, कडुलिंब, हिरडा, बेहडा, सुबाभूळ अशा प्रजातींच्या हेक्टरी 4.80 किलो वृक्षांच्या बियाण्यांची किंवा सिताफळ, बोर, चिंच, विलायती चिंच, कवठ, जांभूळ, करवंद, शेवगा, काजू इ. कोरडवाहू फळझाडांच्या बियाण्यांची पेरणी करावी किंवा शेतक-यांच्या आवडी व इच्छेप्रमाणे बियाणांची लागवड करावी.
 • चराच्या भरावावर पूर्ण लांबीला हॅमाटा, पवना, मारवेल, डोंगरी गवत, मद्रास अंजन, शेडा, निल गवत अशा प्रजातीच्या हेक्टरी 4.80 किलो गवताच्या बियाणांची पेरणी करावी.