प्रस्तावना-
बियाणे हा घटक पिकाचे उत्पादन व उत्पादकता वाढीमध्ये महत्वाचा आहे. संशोधनानुसार असे निदर्शनास आलेले आहे की, केवळ बियाणे या घटकामुळे उत्पादनात 20 ते 25 टक्क्यांची वाढ होते. पिकांच्या सुधारीत व संकरीत जाती विकसीत केल्यामुळे पिकांच्या उत्पादनात व उत्पादकतेमध्ये लक्षणिय वाढ होते. उदा. भात, ज्वारी, बाजरी, गहु, कापूस व भाजीपाला पिके इ.
बियाणे पुरवठा व नियोजन-
बियाणे पुरवठ्याचे नियोजन करताना पीकनिहाय पिकाखालील येणारे क्षेत्र, विद्यापीठाने निश्चित केलेली पीकनिहाय प्रतिहेक्टरी पेरणीसाठी वापरावयाची बियाणे मात्रा (seed rate) आणि केंद्र शासनाने निश्चित केलेले पीकनिहाय बियाणे बदल (SRR) या तीन बाबी विचारात घेतल्या जातात. त्यानुसार बियाण्याची प्रत्यक्ष गरज निश्चित केली जाते. शेतकऱ्यांना पुरवठा करावयाचे बियाणे प्रमाणित बियाणे किंवा सत्यता दर्शक बियाणे असते. महाबीज व राष्ट्रीय बीज निगम या सार्वजनिक संस्थांकडून प्रमाणित बियाणे तसेच खाजगी संस्थांकडून सत्यतादर्शक/ संशोधित वाणाचे बियाणे पुरवठा केला जातो..